भाग २ : १९४७ - १९८९
११. श्रद्धांजली
एसएम यांच्या कालवश होण्याने महाराष्ट्रच नव्हे तर सारा देश हळहळला. एसएम उभ्या आयुष्यात सरकारी पदावर कधीही नव्हते. परंतु त्यांच्यावर सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचे पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती आर व्यंकटरामन, उपराष्ट्रपती शंकर दयाल शर्मा आणि अनेक मंत्र्यांनी शोकसंदेश पाठवले. लोकसभा सचिवालयातून “Eminent Parliamentarians Monograph Series’ या अंतर्गत निवडक खासदारांचे चरित्र प्रसिद्ध केले जाते. यात फेब्रुवारी १९९२ मध्ये एसएम जोशी यांच्यावर ग्रंथ प्रसिद्ध झाला. यात एसएम यांच्या अनेक सहकाऱ्यांनी एसएम यांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रपती आर व्यंकटरामन
राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांनी एस एम जोशी यांच्या कार्याचा गौरव केला, “श्री जोशी हे ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या विचारसरणीचे मूर्त स्वरूप होते. ते समाजवाद्यांमध्ये गांधीवादी आणि गांधीवाद्यांमध्ये समाजवादी होते. निकोप कामगार चळवळीतील त्यांचे योगदान लोकांच्या मनात दीर्घकाळ राहील”
उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा
एसएम यांना श्रध्दांजली अर्पण करताना उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा म्हणाले, “स्वातंत्र्यापूर्वीचे गांधीयुग आणि विशेषतः महाराष्ट्राचे आणि देशाचे स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण यांच्यातील ज्वलंत दुवा असलेले श्रीधर महादेव जोशी यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. जोशी यांच्या निधनाने देशाने एक देशभक्त, गांधीवादी आणि समाजवादी गमावला.”
पंतप्रधान राजीव गांधी
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एसएम यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना म्हटले: “श्री जोशी यांच्या निधनाने आपण एक स्वातंत्र्यसैनिक गमावला आहे. श्री जोशी यांनी आपले जीवन गरीब आणि दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. श्री. जोशी हे एक सच्चे राष्ट्रवादी होते. त्यांची देशाच्या प्रगती आणि कल्याणासाठी असलेली बांधिलकी दीर्घकाळ स्मरणात राहील.”
लोकसभा सभापती डॉ. बलराम जाखड
लोकसभेत तत्कालीन सभापती डॉ. बलराम जाखड यांनी श्री जोशींना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले: “श्री जोशी यांचा मूल्याधारित राजकारणावर विश्वास होता. वंचित आणि दलित वर्गाच्या सामाजिक न्यायासाठी त्यांनी निर्भीड आणि अथक प्रयत्न केले. देशात निकोप ट्रेड युनियन चळवळीचा उदय होण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.”
जयप्रकाश नारायण (एसएम हयात असताना)
एसएम यांच्या बाबतीत जयप्रकाश नारायण एकदा म्हणाले होते: “एसएम यांची महानता त्यांच्या भावना, जीवनमूल्यांबद्दलची त्यांची कळकळ, त्यांची प्रामाणिकता व साधेपणा, त्यांची वंचितांबाबतची आपुलकी, यात आहे. अशा व्यक्तीबरोबर माझा आलेला संपर्क हे माझे भाग्य आहे.”
रबी रे
(रबी रे हे लोकसभा सदस्य होते. १९८९ मध्ये त्यांची लोकसभेच्या सभापतिपदी निवड झाली.) - निवडक उताऱ्यांचे भाषांतर
एक महान राजकीय कार्यकर्ते आणि समाजवादी विचारवंत म्हणून श्री जोशी यांची स्मृती भारतातील लोकांच्या मनात कायम कोरलेली राहील. आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच त्यांच्या मानवतावादाने त्यांना एक समाजवादी नेता बनवले. एक राजकीय क्रांतिकारक म्हणून ते जनमानसात लोकप्रिय होते. त्यांनी नेहमीच वंचितांच्या हितासाठी प्रयत्न केले. त्यांचे जीवन हे जणू समाजवादी चळवळीचे एक प्रतीक होते. देशात समाजवादी विचारसरणीचा प्रसार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी नेहमीच राजकारणाचे अध्यात्मिकीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या सर्व मुद्द्यांवर पक्षविरहित दृष्टिकोनातून विचार केला. त्यांचे सिद्धांत आणि व्यावहारिकता या दोन्हींचे सुरेख मिश्रण त्यांच्यात होते. भारतातील समाजवादी चळवळीला नवीन दिशा देण्याचे कार्य एसएम यांनी केले. जातिवाद, सांप्रदायिकता आणि प्रादेशिकतेच्या अडथळ्यांना ओलांडून त्यांनी वैश्विक दृष्टिकोन ठेवला. एसएम यांच्या स्मृतीस खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांचे विचार आणि त्यांची मूल्ये यांचे अनुसरण करणे हेच होय!
शरद पवार
(शरद पवार हे केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री होते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.) - निवडक उताऱ्यांचे भाषांतर
एसएम हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांमधील एक महत्त्वाचा दुवा होते. गांधीयुगातील सेवा आणि त्यागाची आम्हाला ते सतत आठवण करून देत. त्यांच्या हृदयात द्वेषाला जागा नव्हती. वर्तमानापेक्षा अधिक चांगला समाज घडविण्यासाठी ते कटिबद्ध होते. त्यांनी विचारधारेपेक्षा आदर्शवादाला अधिक महत्त्व दिले. एसएम १९५२ आणि १९५७ मध्ये दोनदा महाराष्ट्र राज्य विधानसभेवर आणि १९६७ मध्ये लोकसभेवर निवडून आले. त्यांनी संसदीय आणि विधानसभेच्या चर्चेत माहितीपूर्ण योगदान दिले. विधिमंडळाला जनतेच्या मागण्या मांडण्याचे व्यासपीठ बनवले आणि बाहेर आंदोलनाद्वारे जनशक्ती निर्माण केली. अशी दुहेरी रणनीती प्रभावी ठरू शकते यावर त्यांचा विश्वास होता. विधानसभेत ते स्पष्टवक्ते आणि स्पष्ट टीका करण्यासाठी ओळखले जात असत. जेव्हा जेव्हा त्यांना सरकारची धोरणे किंवा कृती चुकीची वाटली तेव्हा त्यांनी त्यावर टीका केली. परंतु त्यात क्षुल्लक पक्षपाती विचार कधीच नव्हते. गेल्या शतकात न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या समकालीनांपैकी एकाचे वर्णन ‘राजकीय ऋषी’ असे केले आहे. मला वाटते, अलीकडच्या काळात एसएम हे असेच एक राजकीय ऋषी होते. आपल्या सार्वजनिक जीवनात नैतिकतेचे झरे त्यांनी कधी सुकू दिले नाहीत. पराभवाने ते खचले नाहीत. आपल्या विवेकबुद्धीचे पालन करून त्यांना प्रिय असलेल्या कारणांसाठी कार्य करण्याचा नेहमीच प्रयत्न केला.
प्राध्यापक मधु दंडवते
(प्राध्यापक मधू दंडवते हे माजी केंद्रीय मंत्री होते.) - निवडक उताऱ्यांचे भाषांतर
एसएम यांच्या मनाला प्रारंभी लोकमान्य टिळकांनी आकार दिला. त्यानंतर महात्मा गांधींच्या जनआंदोलनाच्या प्रभावाखाली ते आले. बुद्ध आणि गांधी यांच्या करुणेच्या भावनेने त्यांना स्पर्श केला. हळूहळू समाजवादी श्रद्धा समृद्ध झाली. समाजवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळात कार्ल मार्क्सच्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. परंतु गांधींच्या मानवतावादाकडेही ते ओढले गेले. जयप्रकाश नारायण आणि युसूफ मेहेरअली यांच्या प्रभावाने क्रूरता आणि कुरूपता याचा तिटकारा त्यांना निर्माण झाला. तसेच साने गुरुजींच्या जीवनाचा आणि संदेशाचा एसएम यांच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या सामाजिक समतेची तळमळ त्यांच्यात जागृत झाली. ज्या मूल्यांसाठी एसएम जगले ती मूल्ये नष्ट होऊ देऊ नका. एसएम यांच्यासारखी माणसे मृत्यूनंतरही आपण मागे ठेवलेल्या मूल्यांतून जिवंत राहतात. एसएम अमर राहोत!
मधू लिमये
(मधू लिमये हे लोकसभेचे माजी सदस्य होते) - निवडक उताऱ्यांचे भाषांतर
सार्वजनिक आणि खाजगी जीवनातील नैतिकता यात एसएम यांनी कधीच फरक केला नाही. इतरांची सेवा करणे आणि त्यांना मदत करणे हे त्यांच्या स्वभावातच होते. स्वार्थाने प्रेरित अशी कोणतीही कृती एसएम यांनी केली नाही. त्यांनी सर्व काही लोकहितासाठी केले. लोकशाही, धर्मनिरपेक्ष राज्य, सामाजिक समता, आर्थिक न्याय इत्यादींवर त्यांचा अढळ विश्वास होता. त्यांचे सत्तेवर प्रेम नव्हते. संपत्ती गोळा करण्याचा विचार त्यांना कधीही शिवाला नाही. अगदी कोवळ्या मनात मला एसएम यांचा प्रेरणादायी सहवास आणि मार्गदर्शन लाभले. मी हे मोठ्या अभिमानाने सांगतो की एसएम माझे पहिले 'राजकीय 'गुरू' होते. त्यांचे निस्वार्थी आणि उदात्त जीवन तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत होते आणि राहील यावर माझा ठाम विश्वास आहे.
डॉ बापू काळदाते
(डॉ बापूसाहेब काळदाते लोकसभा सदस्य होते) - निवडक उताऱ्यांचे भाषांतर
नेत्याला नेहमीच लोकांच्या भावना आणि आकांक्षांची जाणीव असणे आवश्यक असते. त्याला खाजगी आयुष्य नसते. इतरांच्या मनात शिरण्याची कला त्याला अवगत असावी लागते. एसएम जोशी या अर्थाने परिपूर्ण नेते होते. ते तरुणांमध्ये, कामगारांमध्ये आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय होते. एसएम अतिशय मनमोकळे, मुक्त आणि निर्भय स्वभावाचे होते. लोकांशी त्यांची वागणूक मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याची होती. यामुळे त्यांना त्यांच्या समस्या आणि अडचणी समजावून घेणे सहज शक्य झाले. एसएम अतिशय संयमी स्वभावाचे होते. ते क्वचितच कुणावर नाराज होत असत. समोरच्याचा मुद्दा फेटाळून लावण्याऐवजी त्यावर चर्चा करून तो सोडविण्याकडे त्यांचा कल असे. एसएम यांच्या स्वभावात बेधडकपणा होता. ते शरीराने कृश असले तरी त्यांच्यात तल्लख बुद्धी आणि कमालीचे धैर्य होते. त्यांच्या प्रामाणिक स्वभावाने त्यांना शत्रू नव्हते. ते अजातशत्रू होते. मी त्यांचा सचिव म्हणून दीर्घकाळ काम केले आणि मला त्यांच्याकडून संघटनात्मक अनुभव खूप मिळाला. एसएम यांचा प्रामाणिकपणा, समर्पण आणि मानवतावाद यांनी मला नेहमीच प्रेरणा दिली. त्यांनी मला घडवले आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. याचमुळे मी एक सामाजिक कार्यकर्ता बनू शकलो. आम्हाला ते एखाद्या शिक्षकासारखे होते. परंतु ते आमच्यात सहज मिसळत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत आम्हाला एक प्रकारचा आनंद जाणवत असे. एसएम यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे आणि दुःखाला तोंड देण्याचे तसेच आपल्या ध्येयांशी व आदर्शांशी एकनिष्ठ राहण्याचे धैर्य दिले. आजच्या गुंतागुंतीच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत त्यांची उणीव भासते. ते आता आमच्यात नसले तरी त्यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श नेहमीच आम्हाला प्रकाश दाखवतील. माझ्यासारख्या अनेकांनी एसएम यांच्या वैभवशाली जीवनाचा अनुभव घेतला. त्यांच्या हाताखाली शिकण्याचा अनेकांना फायदा झाला. ते सर्व त्यांनी मागे ठेवलेल्या वर्षांची जिवंत साक्ष आहेत!
ना ग गोरे
(ना ग गोरे हे लोकसभेचे माजी सभासद आणि ब्रिटनमध्ये भारताचे हाय कमिशनर होते) - निवडक उताऱ्यांचे मराठी अनुवाद
जेंव्हा मी एस एम जोशी यांच्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला असे वाटते की मी माझे आत्मचरित्रच लिहीत आहे. आयुष्यभर विचार आणि कृती यांचे आदानप्रदान केल्यानंतर असे होणे अपेक्षितच आहे. माझ्यातला ‘मी’ त्यात डोकावला तर त्यात काही नवल नाही. १९२२ पासून एसएम यांच्या अखेरपर्यंत आम्ही एकत्र विचार केला, स्वातंत्र्यलढ्यात एकत्र सहभागी झालो, एकत्र तुरुंगवास भोगला आणि राष्ट्रीय काँग्रेसपासून एकत्र वेगळे झालो. इतकेच नव्हे तर कामगार संघटनांच्या चळवळी, सामाजिक परिवर्तन, गोवा मुक्ती संग्राम अशा अनेक चळवळींमध्ये आम्ही एकत्र काम केले. परंतु असे असले तरी आम्ही दोघांनी स्वतःचे अस्तित्व आणि वैयक्तिक ओळख कायम ठेवली. आमच्यामधील काही प्रसंगी झालेले मतभेद सोडता आमच्यातली ६० वर्षाहून अधिक काळाची अशी घट्ट मैत्री संपूर्ण देशात क्वचितच पहायला मिळेल. एसएम परिपूर्ण आयुष्य जगले. त्यांचा जन्म पुण्यात झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहानश्या गावी त्यांचा जन्म झाला. तत्कालीन चित्पावन ब्राह्मण समाजाला अनुसरून जोशी कुटुंब देखील एक कुलवंत परंतु अतिशय गरीब कुटुंब होते. एसएम यांचे वडील सरकारी नोकरीत अतिशय सामान्य पदावर काम करीत होते. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि जोशी कुटुंबावर आर्थिक दुर्दशा ओढवली. एसएम यांनी पुण्यात येऊन स्वबळावर पुढील शिक्षण घेतले. त्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
माझी एसएम यांच्याशी पहिली ओळख डेक्कन एजुकेशनच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये झाली. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरु केलेली ती शाळा. मी आणि एसएम एकाच वर्गात होतो. परंतु एसएम आमच्या वर्गात सर्वांपेक्षा वयाने थोडा मोठा होता. एसएम यांचा माझ्यावर आणि इतर विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव असे. एसएम यांचे वय आणि त्यांची तल्लख बुद्धी यांचा कदाचित तो परिणाम असावा. एसएम अभ्यासात जरी सर्वात पुढे नसले तरी सर्वाना एकत्र घेऊन जाण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये तेव्हापासूनच होते. एसएम जरी कफल्लक होते तरी त्याच्या पालकांची त्याला मोठी देणगी होती. एसएम गोरेपान, डोक्यावर दाट काळे केस, घारे डोळे, सडपातळ आणि उंच होते. नेटके राहण्याची त्यांना आवड होती. किंबहुना टापटिपीत राहण्यात त्यांना अभिमान वाटे. त्यांचे डोळे अतिशय बोलके होते. अन्यायाविरुद्ध चीड आणि काही चांगल्या प्रसंगातून मिळालेला आनंद त्यांच्या डोळ्यातून सहज व्यक्त होत असे. ते अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या कामासाठी सदैव तत्पर असत. एसएम आणि आम्ही मित्र मार्क्स आणि गांधी यांच्या तत्वांनी प्रभावित झालो होतो. एम एन रॉय यांच्या विचारांचा देखील एसएम यांना आदर होता. त्यांनी उर्दूचा अभ्यास केला होता आणि ते उर्दूमध्ये सहज संभाषण करू शकत. त्यांच्या उर्दूवरील प्रभुत्वाचा त्यांना पुढे जाऊन चलेजाव चळवळीत खूप फायदा झाला. ‘इमाम अली’ या नावाने त्यांनी वेषांतर केले आणि मुस्लिम व्यक्ती म्हणून मुंबईच नव्हे तर वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत त्यांनी प्रवास केला.
परंतु एसएम प्रसिद्धीझोतात आले ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. एका प्रसंगी भडकलेल्या जमावाने एका पोलीस इन्स्पेक्टरला घेराव घातला. एसएम योगायोगाने घटनास्थळी होते. त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरला पाठीशी घातले आणि ‘या पोलिसाला हात लावण्याआधी मला मारा आणि मग पुढे व्हा’ असे आव्हान जमावाला केले. एसएम यांच्या कृतीने जमाव शांत झाला आणि अनर्थ टळला. गांधीजींच्या शिकवणीचे हे एक आदर्श उदाहरण होते. अशी कृती आपल्याला क्वचितच पहायला मिळेल. संसदीय कामकाजात एसएम यांचा प्रामाणिक सहभाग असे. दोनदा महाराष्ट्र विधानसभा आणि त्यानंतर लोकसभेला ते पुण्यातून निवडून आले. विरोधी बाकावर असताना ते अतिशय दक्ष परंतु सकारात्मक असत. विरोधी पक्षाची भूमिका निभावत असताना देखील त्यांनी सरकारवर असभ्य टीका कधीच केली नाही. पक्षफोडी किंवा असभ्य निदर्शने त्यांनी कधीच केली नाहीत. त्यांच्याकडे असामान्य वक्तृत्व कौशल्य नव्हते. परंतु कोणताही विषय अतिशय अभ्यासपूर्वक आणि पारदर्शक पद्धतीने ते सभासदांपुढे मांडत. वंचितांचे हित हे त्यांचे प्राथमिक ध्येय असे.
राष्ट्र सेवा दलाची निर्मिती आणि प्रसार यात एसएम यांचा फार मोठा वाटा आहे. भारत देश विविधतेने नटलेला आहे. विविध चालीरीती, अनेक धर्म, जातिभेद, आर्थिक तफावत असे अनेक घटक देशात अस्तित्वात आहेत. या परिस्थितीत सामाजिक संघर्ष अटळ आहेत. आक्रमक मूलतत्त्ववादी प्रवृत्ती देशातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी बाधक ठरली आहे. देशाच्या बांधणीसाठी एक नवी दिशा देणे आवश्यक आहे. धर्म, जात, वर्ग यापलीकडे जाऊन देशाच्या उभारणीस तत्पर अशा तरुण पुरुष आणि स्त्रियांची ताकद निर्माण होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या दृष्टीने देशभर प्रयत्न झाले असते तर आज दिसणारी विघटनवादी आणि सांप्रदायिक ताकद निर्माण झाली नसती. आजही देशात साक्षरतेचा अभाव आहे. लोकशाही, सामाजिक समता, नागरी स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, याचा खरा अर्थ त्यांना अजून समजलेला नाही. याबाबत औपचारिक प्रशिक्षण त्यांना मिळालेच नाही. एसएम यांच्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्याची महती समजण्यासाठी या सर्व परिस्थितीची जाणीव होणे आवश्यक आहे.
एसएम यांचा मृत्यू एका योध्याचा मृत्यू होता. आजच्या अस्थिर परिस्थितीत एसएम यांचा संदेश मला अशा दाखवतो, ‘प्रयत्न करत राहा, शोध घेत राहा, कधी हार मानू नका!’