भाग २ : १९४७ - १९८९  

१० अखेरचे पर्व (१९८०-१९८९)

एक ऑगस्ट १९८३ रोजी टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने  एसएम यांना ‘लोकमान्य टिळक सन्मान’ पारितोषिक देण्यात आले. लोकमान्य टिळक हे एसएम यांच्यासाठी एक प्रेरणास्थान होते.  लोकमान्यांच्या नावाने दिलेला पुरस्कार आपल्याला मिळावा यात एसएम यांना आपले फार मोठे भाग्य आहे असे वाटले.  आपल्या ५५ वर्षाच्या राजकीय जीवनाची ही प्रसाद पावती आहे अशी एसएम यांची भावना होती. राष्ट्रीय कार्यात सहकार्य केलेल्या हजारो ज्ञात आणि अज्ञात सहकाऱ्यांचा हा सन्मान आहे अशी त्यांची भावना होती.

एसएम अतिशय खडतर परंतु यशस्वी जीवन जगले. अतिशय कठीण परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले. तरुण वयातच समाजवादी विचारांनी प्रभावित होऊन आयुष्यभर त्याचा पाठपुरावा केला. समाजवादी प्रेरणेने स्थापन झालेल्या राष्ट्र सेवा दलाचे १९४१ ते १९४३ आणि १९४७ ते १९५४ या काळात एसएम यांनी दलप्रमुख म्हणून काम केले. स्वातंत्र्योत्तर काळातही शेतकरी,  कामगार यांच्यासाठी झटत राहिले. १९५३ ते १९६२ या काळात महाराष्ट्र विधानसभेवर दोन वेळा तर १९६७ ते १९७२ या काळात चौथ्या लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे यशस्वी नेतृत्व केले. देशात लोकशाही प्रबळ करण्याच्या ‘जनता पक्ष' प्रयोगात एक अग्रगण्य नेते म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.

एसएम यांनी साहित्य क्षेत्रात देखील लक्षणीय काम केले. विद्यार्थी दशेतच त्यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकासाठी उत्कृष्ट लेखांचे योगदान दिले. काही काळ ते ‘फ्री प्रेस जर्नलमध्ये’ वार्ताहर म्हणून काम करत होते. ‘पूना डेली न्युज’, ‘लोक मित्र’ या दैनिकांचे संपादक म्हणून देखील त्यांनी काम केले. समाजवादावर त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. 'सोशालिस्ट क्वेस्ट फॉर राइट पाथ' हे त्यांचे पुस्तक देखील प्रसिद्ध झाले आहे. १९८४ मध्ये त्यांनी ‘मी एस एम’ हे आत्मचरित्र लिहिले.  

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावून अनेक उच्च पदे भूषवली तरी एसएम यांची राहणी अतिशय साधी होती. त्यात कोणताही बडेजाव नव्हता. वर्णाने गोरे आणि नाकी डोळी नीटस असले तरी त्यांची शरीरयष्टी किरकोळ होती. तरुण वयात अनेक वेळा तुरुंगवास भोगल्याने त्याचा प्रकृतीवर परिणाम झाला होता. दैनंदिन व्यवहार असो अथवा सार्वजनिक कार्यक्रम असो, खादीचा धुतलेला पायजमा, नेहरू शर्ट आणि काळा कोट असा त्यांचा पोशाख असे. त्यांची वाणी परखड असली तरी कुणाला कारण नसताना कधीच दुखावणारी नव्हती. 

आयुष्यभर स्वातंत्र्य लढ्याला आणि सामाजिक कार्याला वाहून घेतले असले तरी एसएम परिपूर्ण सांसारिक जीवन जगले. अर्थात त्यात त्यांच्या पत्नी ताराबाई यांचा फार मोठा वाटा होता.  एसएम यांच्या अनियमित आणि तुटपुंज्या कमाईमध्ये देखील त्यांनी आनंदाने संसार केला. आयुष्यभर ‘भावे स्कूल’ मध्ये शिक्षिकेची नोकरी करून घरचा आणि अर्थार्जनाचा गाडा ताराबाईंनी यशस्वीपणे ओढला. ताराबाईंनी एसएम यांच्या राजकीय आणि सामाजिक परिवारातील कार्यकर्त्यांशी छान जुळवून घेतले.  एसएम यांच्या तुरुंग यात्रा चालू होत्या तोपर्यंत ताराबाईंना सतत यातना भोगाव्या लागल्या. परंतु एसएम यांच्या जीवनाशी एकरूप झाल्या असल्याने त्या त्यांनी धैर्याने सहन केल्या. दांपत्या पोटी दोन सुपुत्र जन्माला आले. मोठा अजय डॉक्टर होऊन बालरोग तज्ञ झाला. त्याने पुण्यात स्वतःचे हॉस्पिटल चालविले. धाकटा मुलगा अभय एअरफोर्स मध्ये पायलट झाला. पाकिस्तान आणि चीन बरोबर झालेल्या युद्धात त्याने यशस्वी भाग घेतला. दोन्ही मुलांच्या पत्नी घरात एकरूप झाल्या. दोन्ही मुलांनी किंवा सुनांनी राजकारणात रस मात्र दाखविला नाही.

६ सप्टेंबर १९८६ रोजी ताराबाईंचे निधन झाले. ताराबाईंच्या निधनाने एसएम यांच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली. १९८४ मध्येच एसएम यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. डॉक्टरांनी ‘बोन कॅन्सर’चे निदान केले. १९८७ च्या डिसेंबरमध्ये कॅन्सरवरील केमोथेरपीच्या उपचारासाठी एसएम यांना काही दिवस मुंबईला ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये ठेवले. या काळात शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र सरकारतर्फे शंकररावांनी एसएम यांना २०,०० रुपयांची मदत देऊ केली. परंतु एसएम यांनी ती सरकारला साभार परत केली. “माझ्या आजारपणाचा बोजा शासकीय तिजोरीवर पडावा हे मला प्रशस्त वाटत नाही” असे एसएम यांनी शंकररावांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले. आपल्या निस्वार्थी वृत्तीची प्रचिती एसएम यांनीदाखवून दिली. 


एसएम यांचा आजार वाढत गेला. एसएम यांचे वय ८४ पूर्ण झाले होते. १ एप्रिल १९८९ रोजी पहाटे एसएम यांची शुद्ध हरपली. नानासाहेब गोरे आणि इतर सहकारी एसएम यांना भेटून गेले. संध्याकाळी साडेपाच वाजता एसएम यांची प्राणज्योत मालवली. एक स्वातंत्र्य सेनानी, एक समाजवादी नेता, एक संवेदनशील माणूस हरपला!