भाग १ : १९०४ - १९४७ 

 ३. स्वातंत्र्य लढ्यात उडी (१९२८-१९३३)

१९२९ च्या डिसेंबर महिन्यात लाहोर येथे काँग्रेस अधिवेशन झाले. ब्रिटिशांनी ‘स्वराज्य’ न दिल्यास काँग्रेस संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करेल असा निर्वाणीचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने असहकार चळवळ पुकारली. गांधीजींनी स्वराज्याचे ११ मुद्दे सरकारसमोर ठेवले.  यांची पूर्तता न झाल्यास सविनय कायदेभंग सुरू करू असा इशारा गांधीजींनी दिला. १२ मार्च १९३० रोजी दांडी यात्रेची सुरुवात करून गांधीजींनी असहकार चळवळीचे राणशिंग फुंकले.

एसएम,  ना ग गोरे आणि खाडिलकर यांनी देशकार्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या असहकार चळवळीत पूर्ण वेळ भाग घेण्याचे तिघांनी ठरवले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतृत्व त्यावेळेस शंकर देवांच्याकडे होते.  तिघांनी शंकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली देश कार्याला सुरुवात केली. शंकर देवांनी ठाणे जिल्ह्यात प्रचार करीत हिंडण्याची कामगिरी एसएम आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपविली. एसएम ठाणे जिल्ह्यामधील वेगवेगळ्या गावात जाऊन प्रचार सभा घेऊ लागले.

ठाणे येथील तुरुंगवास 

शंकर देवांनी एसएम आणि वामन परांजपे या दोघांना प्रचारासाठी अलिबाग येथे पाठविले. अलिबाग येथील प्रचार सभेसाठी दोघांनी १० मे १९३० हा दिवस निवडला. दोघांनी  सभेमध्ये अतिशय आवेशाने भाषणे केली. सभा आटोपून दोघेही मुक्कामाला पोहोचले. रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी दार ठोठावले आणि दोघांनाही अटक करून पोलीस लॉकअप मध्ये नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी कोर्टाने एसएम आणि परांजपेंना सहा महिन्याची सजा सुनावली.  शिक्षा सांगून होताच एका माणसाने येऊन दोघांवर फुले उधळली आणि खादीच्या शाली घातल्या.  दोघांना रेवस-मुंबई मार्गे ठाणे मध्यवर्ती तुरुंगात आणण्यात आले.  एसएम यांच्यासाठी आयुष्यातील हा तुरुंगवासाचा प्रथम अनुभव होता. 

ठाण्याच्या कारावासात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना डांबले होते.  त्यात शंकर देव, काकासाहेब गाडगीळ, बाळासाहेब खेर, एच एम जोशी असे अनेक मोठे नेते होते. कारावासाच्या दरम्यान एसएम यांची ओळख या नेत्यांशी आणि इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांशी  झाली. संवादातून विचार प्रगल्भ झाले. तुरुंगवासात एसएम यांनी सफाई, केस कापणे अशी अनेक कामे आनंदाने केली. एसएम यांचे सहकारी ना ग गोरे आणि खाडीलकर यांना येरवडा तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यांचे तुरुंगात खूप हाल होत आहेत याची बातमी एसएम यांना कळली आणि त्यांना त्याचे फार दुःख झाले. तुरुंगात असताना एसएम यांना ‘मार्क्सवादी वांग्मय’ वाचण्याचा योग आला. एसएम यांनी त्याचा संपूर्ण अभ्यास केला आणि मार्क्सवादी विचारांनी एसएम प्रेरित झाले. तुरुंगात एसएम यांना लोक ‘सोशालिस्ट जोशी’ म्हणून ओळखू लागले. तिकडे गोरे आणि खाडिलकर यांनी देखील मार्क्सवादाचा अभ्यास केला आणि ते देखील मार्क्सवादी विचारांनी प्रेरित झाले. सहा महिन्यांनी एसएम यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली.

सुटून आल्यावर एसएम यांनी पुण्यामध्ये ‘मंगल भुवन’ येथे एक खोली घेतली आणि खाडिलकर यांच्याबरोबर ते तेथे राहू लागले. पुढील शिक्षणासाठी एसएम यांनी एल एल बी च्या टर्म्स भरायला सुरुवात केली. उदरनिर्वाहासाठी एसएम यांनी ‘फ्री प्रेस न्यूज सर्विस’ येथे मर्यादित वेळ काम करायला सुरुवात केली. त्या काळात गोगटे नावाच्या तरुणाने गव्हर्नर हॉटसनवर गोळ्या झाडल्या. परंतु त्यातून हॉटसन वाचला. एसएम यांनी ही बातमी फ्री प्रेस मध्ये दिली आणि ती देशभर गाजली.  प्राचार्यांच्या जेव्हा हे ध्यानात आले तेव्हा त्यांनी एसएम आणि त्यांचे सहकारी गोरे आणि खाडिलकर यांना कॉलेजमधून एम ए करण्याची परवानगी नाकारली.

येरवडा येथील तुरुंगवास 

१९३१ च्या डिसेंबर महिन्यामध्ये एसएम, गोरे आणि खाडीलकर यांनी पुण्यामध्ये एक युवक परिषद भरविली. सुभाषचंद्र बोस यांना या परिषदेसाठी अध्यक्ष म्हणून बोलाविले. ही परिषद बरीच गाजली. परिषदेनंतर थोड्याच दिवसात सुभाषचंद्र बोस यांना अटक करण्यात आली.  देशभर दहशतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या तरुणांना अटक करण्याचे सत्र ब्रिटिश सरकारने हाती घेतले. ६ जानेवारी १९३२ रोजी एसएम यांना दोन महिन्याची स्थानबद्धतेची शिक्षा ठोठावण्यात आली. 

एसएम यांना स्थानबद्धतेची शिक्षा मंजूर नव्हती. त्यांनी निर्बंध मोडून स्वतःला अटक करून घेण्याचा निर्णय घेतला. एसएम यांनी पुण्याच्या हद्दीत प्रवेश करताच पोलिसांनी त्यांना अटक केली.  एसएम यांना कोर्टासमोर उभे करण्यात आले. २३ मार्च १९३२ रोजी मॅजिस्ट्रेटने त्यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांची येरवडा तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली. 

येरवडा तुरुंगात असताना एसएम यांना महात्मा गांधी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. गांधीजी देखील त्यावेळेस येरवडा तुरुंगात कारावास भोगत होते. एसएम यांनी गांधीजींना अहिंसेबाबत आणि इतर काही प्रश्न विचारले आणि गांधीजींनी प्रश्नांचे निराकरण केले. गांधीजींची ही भेट एसएम यांच्या आठवणीत कायम राहिली. तुरुंगवासाच्या कालावधीत शेवटचे सात-आठ महिने एसएम यांना विसापूर जेलमध्ये ठेवले होते.  या काळात एसएम यांची स का पाटील यांच्याबरोबर ओळख झाली  आणि तिचे मैत्रीत रूपांतर झाले. दोन वर्षाच्या शिक्षेत सूट मिळून एसएम नोवेंबर १९३३ च्या सुमारास विसापूर जेल मधून मुक्त झाले. विसापूरहून ट्रेनने एसएम पुण्याला आले. आता एसएम समाजात एक ‘समाजवादी देशभक्त’ या नावाने ओळखले जाऊ लागले. 

विसापूरच्या तुरुंगातून सुटल्यानंतर एसएम पुण्यात राहू लागले.  एल एल बी च्या  पहिल्या दोन टर्म पूर्ण झाल्या होत्या. एसएम यांनी  सेकंड एल एल बी च्या टर्म्स भरल्या. सेकंड एल एल बी च्या टर्म्स पुऱ्या करून एसएम परीक्षेत पास झाले.  देशकार्याच्या व्यापात पुरेसा अभ्यास न करता आल्याने एसएम यांनी एल एल बी जेमतेम पूर्ण केले. उदरनिर्वाहासाठी एसएम यांनी काही दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या ट्युशन्स घेतल्या तर नंतर ‘पूना स्कूल ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेमध्ये अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषय शिकवले. या काळात थोडेफार अर्थार्जन झाले परंतु एसएम यांनी अनेक जिवलग मित्र मिळविले.