भाग १ : १९०४ - १९४७ 

४. काँग्रेस समाजवादी पक्ष  (१९३३-१९४०)

१९३० च्या सुमारास कांग्रेसमध्ये एक समाजवादी गट तयार होत होता. जयप्रकाश नारायण, डॉ राममनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, मेहेर अली, मिनू मसानी, अशोक मेहेता, अच्युतराव पटवर्धन, एस एम जोशी, ना ग गोरे, इत्यादी नेते भारतातील समाजवादी विचारांचे आद्य समर्थक होते. समाजवादी विचारसरणीचा पाया मार्क्सवादावर आधारित असला तरी त्यापलीकडे जाऊन साम्राज्यवाद्यांच्या जोखडाखाली पारतंत्र्यात असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये राष्ट्रवादाचा विचार महत्वाचा आहे आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेणे हे  प्राथमिक कर्तव्य आहे हा दृढ विश्वास समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांचा होता. 

मार्क्सवादी विचारांमधील वर्गभेदाविरुद्धचा लढा आणि गांधीजींनी मांडलेला वर्णभेदाविरुद्धचा लढा या दोन्हीची समाजपरिवर्तनासाठी आवश्यकता आहे या निर्णयापर्यंत भारतातील समाजवादी नेते आले होते. तसेच मार्क्सवादाच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाचा मूलाधार असणारे मानव्यासंबंधीचे प्रेम हे मूल्य समाजवाद्यांनी स्वीकारले होते. माणसाला माणसासंबंधी प्रेम वाटणे हे शाश्वत सत्य आहे. मानवी मूल्यांचे आणि मानवी समतेचे तत्वज्ञान हा समाजवादी आंदोलनाचा पाया आहे आणि मार्क्सवादापेक्षा समाजवादाचे वेगळेपण या तत्वज्ञानात आहे. मार्क्सच्या मते आपले साध्य उदात्त असेल तर कोणतीही साधने वापरून ते प्राप्त करून घेतले पाहिजे. या उलट गांधींची अशी भूमिका होती की, साध्य आणि साधने ही एकमेकांना अनुरूपच असली पहिजेत. साध्य उदात्त असेल तर साधनेही शुद्ध असली पाहिजेत. गांधींचा साधनशुचितेचा विचार समाजवादी विचारांच्या नेत्यांना मनोमन पटला. समाजातील आर्थिक शोषण थांबले आणि प्रत्येकाला अन्न, वस्त्र व निवारा मिळाला की सर्व प्रश्न सुटतील असा मार्क्सवादाचा विश्वास होता. परंतु केवळ चांगले खायला प्यायला मिळणाऱ्या पशुंचा समाज म्हणजे समाजवाद नाही.  चांगली उद्दिष्टे आणि चांगल्या मार्गाचा वापर आवश्यक आहे. 

भारतातील समाजवादाची उत्पत्ती श्री एम एन रॉय यांनी मांडलेल्या तत्वज्ञानात किंवा ‘रॉयवाद’ यात आहे असे ढोबळपणाने म्हणता येईल. एम एन रॉय यांनी रशियन राज्यक्रांतीत लेनिनचे सहकारी म्हणून कार्य केले होते. पुढे कम्युनिस्टांबरोबर वैचारिक मतभेद झाल्यावर ते भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एम एन रॉय यांचे लेखन अतिशय प्रभावी होते. त्यांनी मार्क्सवाद काहीशा वेगळ्या पद्धतीने समाजासमोर मांडला. कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबाबतच्या भूमिकेला रॉय यांनी खंबीर विरोध केला होता. कम्युनिस्टांची अशी भूमिका होती की गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची चळवळ, ही एक भांडवलशाही चळवळ आहे आणि त्या चळवळीपासून कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांनी दूर राहिले पाहिजे. रॉय यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मते साम्राज्यवाद्यांच्या जोखडाखाली पारतंत्र्यात असणाऱ्या देशामध्ये राष्ट्रवाद हा पुरोगामी विचार असून या विचाराच्या आधारे होणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीत समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी झालेच पाहिजे. समाजवादी नेत्यांना रॉयवाद योग्य वाटला. देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढणे हे  प्राथमिक ध्येय असले पाहिजे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. 

समाजवादी पक्षाची स्थापना 

ऑगस्ट १९३४ मध्ये समाजवादी विचारांच्या नेत्यांची बनारस येथे बैठक झाली. या बैठकीस अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण, मिनू मसानी, मेहर अली, गंगाशरण इत्यादी नेते हजर होते. एसएम देखील सभेला हजर होते. देशभरातील समाजवादी नेत्यांची एसएम यांच्या बरोबर पहिली ओळख या बैठकीत झाली. ‘काँग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पक्षाचा उद्देश आणि पक्षाची घटना काय असावी यावर चर्चा झाली आणि त्यावर  शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर २१ आणि २२ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबई येथे पक्षाची पहिली परिषद भरवली गेली. देशभरातून समाजवादी विचारांचे १५० हून अधिक नेते परिषदेला उपस्थित होते. या परिषदेत पक्षाची औपचारिक स्थापना झाली. पक्षाचे नाव ‘अखिल भारतीय काँग्रेस समाजवादी पार्टी’ असे ठेवण्यात आले. जयप्रकाश नारायण यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीस पद आले. ना ग गोरे म्हणजेच नानासाहेब गोरे यांना जॉइंट सेक्रेटरी करण्यात आले. एसएम यांना देखील कार्यकारी मंडळात घेण्यात आले. 

पक्षाची कामाची दिशा पुढील प्रमाणे ठरवण्यात आली: १. अखिल भारतीय काँग्रेसच्या अंतर्गत काम करणे, २. कामगार आणि शेतकरी यांना एकत्रित करणे, ३. देशातील तरुण, स्त्रिया इत्यादींना स्वातंत्र्य चळवळीत आणणे, ४. साम्राज्यशाहीचा  विरोध करणे, ५. ब्रिटिश सरकारशी असहकार 

साबरमती येथील तुरुंगवास 

एम एन रॉय यांना अटक होऊन त्यांना बारा वर्षाची शिक्षा झाली. रॉय हे तुरूंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी चौपाटीवर सभा घेतली गेली. सभेमध्ये एसएम यांनी अतिशय प्रभावी भाषण केले आणि रॉय यांना ताबडतोब तुरुंगातून सोडावे यासाठी दंड थोपटले.  चौपाटीवर झालेल्या  भाषणाबद्दल एसएम यांना ४ डिसेंबर १९३४ रोजी दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. एसएम यांना साबरमती तुरुंगात पाठवण्यात आले. साबरमती तुरुंगात एसएम यांना क वर्ग देण्यात आला. या तुरुंगवासात एसएम यांनी अनेक हाल अपेष्टा भोगल्या. तुरुंगवासात असताना एसएम यांनी मार्क्सवादावरील पुस्तके तसेच इतर अनेक पुस्तकांचे वाचन मात्र भरपूर  केले. १ ऑगस्ट १९३६ रोजी एसएम यांची साबरमती तुरुंगातून सुटका झाली. त्याच दिवशी एसएम यांचे टिळक पुण्यतिथी निमित्त पुण्यामध्ये भाषण देखील झाले. 

फैजपूर काँग्रेस अधिवेशन 

२७ आणि २८ डिसेंबर १९३६ रोजी महाराष्ट्रातील फैजपूर येथे काँग्रेसचे ५० वे अधिवेशन भरले. जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. एसएम यांना फैजपूर काँग्रेसच्या प्रचार समितीचे चिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रचाराच्या निमित्ताने एसएम खानदेशातील गावागावातून दीड महिन्याहून अधिक काळ हिंडले. एसएम यांचा संपर्क सामान्यतः शहरी भागातच होता. या भ्रमंतीत भारताच्या ग्रामीण भागाची घडण एसएम यांना जवळून पाहण्याचा योग आला. देशातील कारखाने आणि मजूर यांच्याबाबत एसएम यांना ज्ञान होते. परंतु भारतात क्रांती घडवून आणायची असेल तर शेतकरी आणि ग्रामीण जनता यांनाही एकत्र आणण्याची आवश्यकता  एसएम यांना जाणवली. 

रॉय यांची तुरुंगातून नुकतीच सुटका झाली होती. फैजपूर अधिवेशनात रॉय यांनी भाग घेतला. एसएम यांनी रॉय यांचे भाषण एकाग्रतेने ऐकले. रॉय यांच्या भाषणाने ते अतिशय प्रभावित झाले. रॉय यांना भेटण्याची संधी एसएम यांना याच वेळेस मिळाली. परिषदेत अध्यक्ष या नात्याने जवाहरलाल नेहरूंचे अध्यक्षीय भाषण अतिशय स्फूर्तीदायी झाले. भाषणात नेहरूंनी समाजवादी विचारांचा पुरस्कार केला. परिषदेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि परिषदेच्या यशाने एसएम यांचे नाव काँग्रेस मधील समाजवादी पक्षामध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले. 

फेब्रुवारी १९३७ मध्ये लोकप्रतिनिधींच्या निवडणुका झाल्या.  या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात एसएम यांनी जोमाने भाग घेतला. पुणे शहर आणि इंदापूर या  भागातील प्रचाराचे काम एसएम यांच्याकडे आले. या प्रचारातून अनेक सभातून भाषणे करणे आणि जनतेच्या संपर्कात येणे एसएम यांना शक्य झाले. या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश आले. महाराष्ट्र काँग्रेसला ५३ पैकी ३७ जागा मिळाल्या. गुजरात भागातील सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या आणि मुंबई प्रांतात काँग्रेस सत्तेवर आली. 

प्रेम विवाह

१९३० च्या सुमारास मार्क्सवादी विचारांच्या वाचनाच्या संबंधात एसएम यांचा ताराबाई पेंडसे यांच्याशी संपर्क झाला.  दोघांची मते आणि विचार जुळले. कर्वे विद्यापीठाच्या पदवीधर झाल्यानंतर ताराबाईंनी पुण्यामध्ये भावे स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी घेतली. दोघांची मने जुळली होती. परंतु एसएम यांच्या जीवनामध्ये प्रेमाला आणि संसारी जीवनाला गौण स्थान होते. त्यामुळे ताराबाईंची तीव्र इच्छा असूनही एसएम विवाहासाठी नकार देत होते. अखेर ताराबाईंच्या आग्रहाला एसएम यांनी मान्यता दिली आणि ते लग्नास तयार झाले. 

ताराबाईंचा हात मागण्यासाठी ते ताराबाईंचे मोठे बंधू सुभाषचंद्र यांना भेटायला गेले. सुभाषचंद्रांनी एसएम यांना एक वाजवी प्रश्न केला, “तुम्ही लग्न ठरवले आहे तेव्हा प्रपंच कसा करणार?  तुम्ही तर काहीही मिळवत नाही”. त्यावर एसएम म्हणाले, “आमचं हे असंच चालणार. परंतु मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, तिची नोकरी सुटली, आणखी काही झालं तरी तिला अन्न मिळणार नाही अशी अवस्था होऊ देणार नाही इतकी जबाबदारी मी मान्य करतो.  माझं काम असंच चालू राहणार. ज्या अर्थी आम्ही लग्न करणार आहोत त्याअर्थी प्रपंच चालवण्याची जबाबदारी तिची आणि माझी दोघांची आहे आणि आम्ही ती पार पाडू.

अखेर दोघांनी विवाहात बद्ध होण्याचे ठरविले आणि १९ ऑगस्ट १९३९ रोजी एसएम आणि ताराबाई यांचा विवाह पार पडला. विवाह एका लहानशा समारंभात रजिस्टर पद्धतीने पार पडला.  काकासाहेब गाडगीळ आणि ताराबाईंचे बंधू या दोघांनी नोंदणी बुकावर सह्या केल्या. लग्न झाले तेव्हा एसएम यांची एकच खोली होती. त्यात त्यांची आई त्यांच्याबरोबर राहात असे. लग्न झाल्यानंतर घरमालकाने एसएम यांना आणखीन एक खोली देऊ  केली. एसएम आणि ताराबाई यांचा संसार सुरू झाला. 

नाशिक येथील तुरुंगवास

१९३९ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये एसएम  आणि ताराबाई विवाह संपन्न झाला आणि ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याविरुद्ध हिटलरने युद्ध पुकारले. प्रथमतः रशिया या युद्धापासून अलिप्त होता. परंतु पुढे रशियाने देखील हिटलर विरोधात युद्ध पुकारले. काँग्रेसमध्ये गांधीजींच्या मते अशा परिस्थितीत सत्याग्रह आणि इतर राष्ट्रीय चळवळी करून ब्रिटिशांना अडचणीत टाकू नये असे होते. परंतु समाजवादी विचारसरणीच्या लोकांना हे साम्राज्यवादी युद्ध नको होते.  समाजवादी विचारसरणीचे नेते युद्धाला विरोध करून सत्याग्रह चालू ठेवण्याच्या विचारांचे होते. 

एसएम यांचे एक सहकारी नाना पुरोहित हे महाड तालुक्यात काम करीत होते. त्यांनी बीरवाडी येथे १९४० च्या मे महिन्यात शेतकरी परिषद घेतली. परिषदेस त्यांनी एसएम, बंडू गोरे आणि माधव लिमाये यांना वक्ते म्हणून बोलाविले. गांधीजींच्या विचारांचा अनादर न करिता युद्धविरोधी विचार एसएम यांनी या भाषणात मांडले. परंतु युद्धविरोधी विचार मांडल्यामुळे ब्रिटिश सरकारने एसएम यांच्याविरुद्ध वॉरंट बजाविले. एसएम, बंडू गोरे आणि माधव लिमये यांच्यावर खटला भरला गेला. भारत संरक्षण कायद्याखाली एसएम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा दिली गेली. 

एसएम यांना नाशिकच्या तुरुंगात बंदी बनवण्यात आले.  नाशिकचा तुरुंग त्या मानाने बराच अल्हादकारक होता.  तुरुंगात  फुलझाडे लावलेली होती, तुरुंगातील खोल्या चांगल्या परिस्थितीत होत्या, शौचालयाची व्यवस्था चांगली होती आणि खेळायला क्रीडांगण होते. एसएम यांचे नाशिकच्या तुरुंगातील जीवन पूर्वीच्या तुरुंगवासाच्या मानाने बरेच सुखकर होते. या तुरुंगवासात एसएम यांची भेट कॉम्रेड डांगे, जांभेकर, ट्रेड युनियनिस्ट पाटकर व इतर अनेक कम्युनिस्ट लोकांशी झाली.  त्याचबरोबर त्यांची भेट सेनापती बापट यांच्याबरोबर देखील झाली. अखेर एप्रिल १९४१ मध्ये एसएम  यांची तुरुंगातून सुटका झाली.