भाग १ : १९०४ - १९४७
५. अंतिम लढा (१९४०-१९४७)
१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युद्धात ब्रिटिशांना मदत करण्याचा पवित्रा घेतला. सैन्यात सामील होऊन ब्रिटिशांना मदत करावी असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत होते. परंतु समाजवादी पक्षाला अर्थातच हा दृष्टिकोन पसंत नव्हता. देशातील तरुणांना राष्ट्रीय कार्यात भाग घेण्याची इच्छा होती. परंतु त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. पुरोगामी विचारांचे संस्कार करण्यासाठी एक युवक संघटना असली पाहिजे असा विचार समाजवादी नेत्यांमध्ये चर्चिला जाऊ लागला.
या धर्तीवर ना सु हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली १९२३ साली ‘हिंदुस्थानी सेवा दला’ची स्थापना झाली होती. ‘शांततापूर्ण आणि न्याय्य मार्गाने स्वराज्यप्राप्तीसाठी तरुणांना शिक्षण देणे आणि त्यांच्यात त्याग आणि समर्पणाची भावना निर्माण करणे’ हे संस्थेचे मूळ उद्दिष्ट ठरवण्यात आले. पुढील काळात संस्थेचे नामांतरण ‘काँग्रेस सेवादल’ आणि नंतर ‘राष्ट्र सेवा दल’ असे करण्यात आले. परंतु या कल्पनेला आणि संस्थेच्या कार्याला व्यापक स्वरूप देणे आवश्यक होते.
राष्ट्र सेवा दलाची स्थापना
वि म हर्डीकर, शिरुभाऊ लिमये आणि नानासाहेब गोरे यांनी पुण्यात काही निवडक समाजवादी नेत्यांची सभा घेतली. एसएम त्यावेळी अजूनही नाशिक तुरुंगात होते. त्यामुळे या सभेला एसएम हजर नव्हते. या बैठकीत राष्ट्र सेवा दलाची पुनर्घटना करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेची उद्दिष्टे ठरवण्यात आली.
तरुणांच्या मनावर राष्ट्रवादी विचारांचा संस्कार करून स्वातंत्र्य चळवळीसाठी स्वयंसेवकांची निर्मिती करणे हा या संस्थेचा मूळ ठरवण्यात आला. भारत देश विविधतेने नटलेला आहे. विविध चालीरीती, अनेक धर्म, जातीभेद, आर्थिक तफावत असे अनेक घटक देशात अस्तित्वात आहेत. या परिस्थितीत सामाजिक संघर्ष अटळ आहेत. आक्रमक मूलतत्त्ववादी प्रवृत्ती देशातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी बाधक आहेत. देशाच्या बांधणीसाठी एक नवी दिशा देणे आवश्यक आहे. धर्म, जात, वर्ग यापलीकडे जाऊन देशाच्या उभारणीस तत्पर अशा तरुण पुरुष आणि स्त्रियांची ताकद निर्माण होणे आवश्यक आहे. देशात साक्षरतेचा अभाव आहे. लोकशाही, सामाजिक समता, नागरी स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, याचा खरा अर्थ त्यांना अजून समजलेला नाही. याबाबत औपचारिक प्रशिक्षण त्यांना मिळालेच नाही. ‘राष्ट्र सेवा दल’ म्हणजे समाजपरिवर्तनाचे एक मुक्त विद्यापीठ असावे अशी संकल्पना तयार करण्यात आली.
४ जून १९४१ रोजी पुणे येथे तरुणांचे एक शिबिर घेऊन जातिधर्मातीत राष्ट्रवाद जोपासण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची पुनर्घटना झाली. राष्ट्र सेवा दल कोणत्याही एका पक्षाचा भाग न ठेवता ही एक स्वायत्त संस्था निर्माण करण्याची योजना आखण्यात आली.
नाशिकच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर नानासाहेब गोरे आणि इतर सहकाऱ्यांनी एसएम यांनी राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख व्हावे अशी विनंती केली. एसएम यांना राष्ट्र सेवा दलाची कल्पना अतिशय आवडली आणि संस्थेचे प्रमुख होण्यासाठी त्यांनी मान्यता दिली. राष्ट्र सेवा दलाचे कार्य हाती घेतल्यानंतर एसएम यांनी स्वतःला अटक करून घेणे टाळावे असे सर्वानुमते ठरले. अर्थातच सार्वजनिक भाषणे आणि सरकारबरोबर प्रत्यक्ष संघर्ष टाळणे आता एसएम यांना आवश्यक होते. १९४१ च्या जून महिन्यामध्ये राष्ट्र सेवा दलाची स्थापना होऊन एसएम दलप्रमुख झाले. राष्ट्र सेवा दलाच्या शाखा महाराष्ट्रभर वाढू लागल्या. शाखेमध्ये संध्याकाळी मैदानावर मुलामुलींनी एकत्र जमायचे, चरखा चिन्ह मध्यभागी असलेल्या तिरंगी राष्ट्रीय झेंड्याला प्रणाम करायचा, कवायत, लेझीम, लाठी, सामुदायिक गाणी, मैदानी खेळ, अभ्यासवर्ग वगैरे कार्यक्रम घ्यायचे. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत झाल्यावर शाखा विसर्जन होई.
शाखांमधून युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता, विज्ञानाभिमुखता इत्यादींची शिकवण दिली जात असे. राष्ट्र सेवा दलाने स्वातंत्र्य लढ्यात पाच मूलभूत तत्वांचा अंगीकार केला. ती पाच मूलभूत तत्वे पुढीलप्रमाणे ठरवण्यात आली: (१) विज्ञाननिष्ठा, (२) धर्मनिरपेक्षता, (३) राष्ट्रवाद, (४) जनसत्ता, (५) समाजवाद.
‘चले जाव’
त्याच सुमारास जागतिक पटलावर अनेक घडामोडी घडत होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना सरकारने त्यांच्या घरीच नजर कैदेत ठेवले होते. सुभाष बाबू या नजर कैदेतून सुटून पेशावर मार्गे देशाबाहेर गेले. सुभाष बाबूंनी ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला. जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून अमेरिका ब्रिटिशांच्या बाजूने युद्धात उतरली. सुभाष बाबूंना नजर कैद होण्याआधी त्यांनी आ रा भट यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी एसएम, गोरे आणि खाडिलकर या तिघांचा उल्लेख केला होता. देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ब्रिटिश सरकार अनेक कार्यकर्त्यांना बंदिवासात टाकण्याची शक्यता आहे. तेव्हा या तिघांनी तुरुंग टाळून ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू ठेवला पाहिजे असे सुभाष बाबूंनी भटांना या पत्रात कळविले होते.
दुसऱ्या महायुद्धात भारतीयांचे समर्थन मिळावे या उद्देशाने ब्रिटिश सरकारने मार्च १९४२ मध्ये ‘क्रिस्प कमिशन’ नेमली. स्टॅनफर्ड क्रिस्प आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना भारतात पाठविण्यात आले. या कमिशनने भारतातील विविध नेत्यांशी चर्चा करून ब्रिटिश सरकारतर्फे एक प्रस्ताव मांडला. भारतीयांनी ब्रिटिशांना महायुद्धात समर्थन दिल्यास महायुद्धानंतर निवडणुका घेतल्या जातील आणि भारतीयांना एक जबाबदार सरकार दिले जाईल असा प्रस्ताव या कमिशनने ठेवला. परंतु या प्रस्तावात कोणतीही स्पष्ट वचनबद्धता नव्हती. इतकेच नव्हे तर भावी फाळणीची बीजे या कमिशनने भारतीय मुसलमानांच्या मनात पेरली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन भरले. गांधीजींनी आपल्या भाषणात क्रिस्प कमिशनचा प्रस्ताव अमान्य केला आणि ब्रिटिशांविरुद्ध ‘चले जाव’ ची घोषणा केली. एसएम या भाषणाला उपस्थित होते. गांधीजींच्या आवेशपूर्ण भाषणाने एसएम यांचे मन थरारून गेले.
भूमिगत चळवळ
काँग्रेसने ‘चले जाव’ ची घोषणा केल्यानंतर युसुफ मेहर अली काही कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळी पुण्यातील ‘जम्मत’ या इमारतीत काही खास समाजवादी नेत्यांची युसुफ मेहर अली यांच्याबरोबर सभा झाली. या सभेत मेहेर आली यांनी सांगितले, “लवकरच बडे नेते नेते पकडले जातील. तुम्ही सहजासहजी पकडले जाणार नाही अशा प्रकारे म्हणजे भूमिगत राहून लढा चालविला पाहिजे. या लढ्यासाठी जी काही संघटना बांधायची आहे ती बांधण्याचे काम तुम्ही सुरू करा.”
भूमिगत मार्गाने चालवायच्या लढ्याचा ढोबळ आराखडा समाजवादी नेत्यांनी तयार केला. ब्रिटिशांची सत्ता केन्द्रे नष्ट करणे, सैन्याच्या हालचालीस प्रतिबंध व्हावा म्हणून पूल उडविणे, तारा तोडणे आदी गोष्टी करावयाच्या, मात्र जीवितहानी करावयाची नाही आणि व्यक्तिगत मालमत्तेवर घाला घालायचा नाही असा कार्यक्रम आखण्यात आला.
८ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीनंतर राजकीय नेत्यांची धरपकड होणार हे निश्चित होते. बैठकीला एसएम, ताराबाई यांच्याबरोबर मुंबईत आले होते. सर्वप्रथम त्यांनी ताराबाईंची रवानगी पुण्याला केली. मुंबईमध्ये जनू भाऊ गुणे हे एसएम यांचे स्नेही वैद्यकीय शिक्षण घेत होते. गुणे आणि त्यांचे मित्र; शेंडे हे दोन विद्यार्थी एका खोलीत राहत असत. एसएम गुणे यांच्याकडे राहावयाला गेले. या इमारतीत अनेक उंदीर होते. त्यावरून समाजवादी कार्यकर्त्यांनी या इमारतीचे ‘मूषक महाल’ असे सांकेतिक नाव ठेवले. या साऱ्या धावपळीत एसएम यांचे दाढी करण्याचे राहून गेले होते. आरशात आपला चेहरा पाहताना त्यांना आपला चेहरा एखाद्या मुसलमान व्यक्तीसारखा वाटला आणि त्यांनी ‘इमाम अली’ नावाने मुसलमान व्यक्ती बनून भूमिगत होण्याचा निर्णय घेतला.
एसएम यांनी एक वर्षाहून अधिक काळ इमाम अली या नावाने घालवला. या काळात पक्षाच्या धोरणानुसार भूमिगत कार्य जोमाने चालू होते. एकदा ताराबाई एसएम यांना भेटण्यासाठी मूषक महालावर आल्या. एसएम यांचा मुलगा अजेय त्यावेळेस अतिशय लहान होता. अजेयला इस्लामी टोपी घालून आणि लुंगी नेसून एसएम बाजारातून भटकून आले. अर्थात ताराबाईंनी या घटनेचा उल्लेख एसएम भूमिगत असताना कोणासमोरही केला नाही.
एसएम यांच्या प्रमाणेच काँग्रेस मधील आणखीही काही कार्यकर्ते भूमिगत झाले होते. भूमिगत कार्यकर्त्यांनी एक संघटना उभारली आणि त्याच्या मार्फत भूमिगत काम चालू केले. एक ‘सेंट्रल डायरेक्टोरेट’ तयार करण्यात आली. या मार्फत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळू लागले. सेंट्रल डायरेक्टरेटने एसएम यांच्यावर परप्रांतातील व्यक्तींशी संपर्क राखण्याची जबाबदारी सोपवली. परप्रांतातील कार्यकर्त्यांना ब्रिटिश सरकार विरोधात काम करण्यासाठी प्रेरित करणे आणि संघटना उभी करणे हे एसएम यांचे काम होते. दिल्ली, पंजाब, कराची, पेशावर अशा अनेक शहरातून एसएम यांनी इमाम अली या नावाने भ्रमंती केली. त्यांच्यासोबत यशवंत पटवर्धन देखील होते. यशवंत पटवर्धन यांनी ‘अब्दुल’ हे नाव धारण केले होते आणि ते एसएम यांच्या नोकराची भूमिका पार पाडत होते.
दुर्दैवाने पोलिसांना भूमिगत कार्यकर्त्यांच्या हालचालीचा सुगावा लागला. १८ एप्रिल १९४३ रोजी पोलिसांनी मूषक महालवर छापा घालून शिरू भाई लिमये, साने गुरुजी, नानासाहेब गोरे, माधव लिमये यांना पकडले. एसएम मूषक महालात नव्हते त्यामुळे ते या पोलीस छाप्यातून वाचले. एसएम कराचीहून मुंबईला आले. मूषक महालावर नुकताच छापा पडलेला असल्याने एसएम ‘हडळ हाऊस’ या इमारतीत राहण्यासाठी गेले. ‘हडळ हाऊस’ हे देखील भूमिगत कार्यकर्त्यांचे राहण्याचे ठिकाण होते. त्या खोलीमध्ये एका बाळंत स्त्रीचा मृत्यू झाला असल्याने त्याचे नाव कार्यकर्त्यांनी ‘हडळ हाऊस’ असे ठेवले होते.
मूषक महाल छाप्यात एसएम, मधु लिमये, विनायक कुलकर्णी असे काही नेते सापडले नव्हते. पोलीस त्यांच्या मागावर होते. एसएम यांची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. अखेर पोलिसांना एसएम यांच्या हालचालीचा सुगावा लागला आणि त्यांनी १८ सप्टेंबर १९४३ रोजी हडळ हाऊस वर छापा घातला आणि त्यात एसएम यांना अटक झाली. या छाप्यामध्ये एसएम यांच्याबरोबर मधु लिमये आणि विनायक कुलकर्णी यांना देखील अटक करण्यात आली. हडळ हाऊस मध्ये सोनू मामा सुतार म्हणून एक घरगडी काम करत होता. एसएम यांची खबरबात पोलिसांना सोनू मामा सुतार याने दिली असण्याची शक्यता आहे कारण छाप्यात सोनू मामा सुतारला देखील पोलिसांनी पकडले आणि थोड्याच दिवसात कोणत्याही पुराव्याशिवाय त्याला सोडून देण्यात आले.
एस्एम् यांना काही दिवसांनी मुंबईला आर्थर रोड तुरुंगात पाठविण्यात आले. पुढे एसएम् यांना नाशिक तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे नानासाहेब गोरे आणि साने गुरुजी त्यांच्या समवेत होते. नाशिक, साबरमती आणि येरवडा जेल अशा तीन तुरुंगांचा अनुभव घेत दोन वर्षांनी १८ सप्टेंबर १९४५ ला एसएम यांची अन्य सहकाऱ्यांच्या समवेत तुरुंगातून मुक्तता झाली.
देशाची फाळणी आणि स्वातंत्र्य
१० फेब्रुवारी १९४७ मध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे विसावे आणि शेवटचे व्हाइसरॉय म्हणून नेमणूक करण्यात आली. भारतावरील त्यांच्या अधिपत्याची अखेर करून सत्ता स्थानिक जनतेच्या हातात देण्याचे ब्रिटिशांनी तत्वतः मान्य केले. या प्रक्रियेला आकार देण्याचे काम हाती घेऊनच माउंटबॅटन भारतात आले. ३ जून १९४७ रोजी माउंटबॅटन यांनी सत्तांतरावरील आपला अहवाल प्रस्तुत केला. हा अहवाल ‘माउंटबॅटन अहवाल’ म्हणून प्रसिद्ध झाला. या अहवालाप्रमाणे ब्रिटिश अधिपत्याखाली असणाऱ्या हिंदुस्थानाची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी होईल. पश्चिमेकडील पंजाब आणि सिंध इत्यादी प्रांत तसेच पूर्वेकडील बंगाल प्रांत यातील बहुसंख्य मुसलमान असणारे प्रदेश पाकिस्तानात जातील तर इतर प्रदेश मिळून भारताची निर्मिती होईल.
प्रथमतः गांधीजींना फाळणी मंजूर नव्हती. परंतु नेहरू आणि इतर नेत्यांच्या आग्रहाखातर गांधीजींनी फाळणीला मान्यता दिली. समाजवादी नेत्यांना फाळणी मंजूर नव्हती. जयप्रकाश नारायण, डॉ लोहिया यांनी गांधीजींचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. परंतु यात त्यांना फारसे यश आले नाही. काँग्रेस कार्यकारणीत फाळणी बाबत चर्चा आणि मतदान घेतले गेले. समाजवादी पक्षाने फाळणी विरोधी भूमिका घेतली. परंतु मतदानात फाळणीच्या बाजूने २९ आणि विरोधी १५ मते पडली आणि काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली.
फाळणीचे दुःख पोटात घेऊन देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.