भाग १ : १९०४ - १९४७
२. देशप्रेम (१९१८-१९२८)
१९१८ ते १९२८ हे दशक एसएम यांच्या आयुष्यातील एक महत्वाचे दशक होते. त्या काळातील राजकीय, सामाजिक, आणि आर्थिक परिस्थिती एसएम च्या मनावर फार मोठा परिणाम करून गेली. जालियनवाला बाग हत्याकांड, टिळकांचा मृत्यू, गांधीजींचा देशाच्या राजकारणात उदय, असहकार चळवळ, अशा अनेक घटनांनी एसएम च्या मनात देशप्रेमाची जागृती झाली. तत्कालीन समाज व्यवस्था आणि त्याच्या परिणामांनी एसएम ला देशाच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेबाबत विचार करण्यास प्रवृत्त केले.
शालेय जीवनातील घटना
१३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथे फार मोठे हत्याकांड झाले. ‘रौलेट’ कायद्याच्या विरोधात अमृतसर मधील कार्यकर्त्यांनी एक फार मोठा मेळावा जालियनवाला बागेच्या पटांगणात आयोजित केला होता. या मेळाव्याच्या विरोधात ब्रिटिश सरकारने बंदी हुकूम काढला. परंतु तरीदेखील फार मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमाला गोळा झाले. ब्रिगेडियर जनरल डायर याने सैन्य बोलावून जमावावर गोळीबाराचा आदेश दिला. जालियनवाला बागेचे पटांगण तीन बाजूंनी बंद होते व येण्याजाण्यासाठी एकच रस्ता होता. सैन्याने या बाजूने गोळीबार सुरू केला. बाहेर पडणारी जनता या गोळीबाराला बळी पडली. ३७९ पेक्षा जास्त लोक गोळीबारात मृत्युमुखी पडले आणि १५०० हून अधिक लोक जखमी झाले. सर्व देशभर या घटनेच्या विरोधात आवाज उठवला गेला. एसएम तेव्हा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. त्याच्या बालमनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. ब्रिटिश सरकारच्या अत्याचारांची आणि देशाच्या पारतंत्र्याची जाणीव एसएम ला या घटनेने झाली.
१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. या घटनेने सारा देश हळहळला. लोकमान्य टिळकांचे देशाच्या राजकारणात फार मोठे स्थान होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला संपूर्ण स्वराज्याचे रूप देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले होते. देशातील अनेक तरुणांसाठी टिळक हे एक प्रेरणास्थान होते. एसएम न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकत असताना लोकमान्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यांचे दर्शन एसएम ला झाले होते. त्यावेळी टिळकांबाबत आदरयुक्त प्रेम एसएम च्या मनात जागृत झाले होते. टिळकांच्या मृत्यूने एसएम चे मन सद्गदित झाले. देशासाठी काहीतरी भरीव काम करण्याचे विचार या घटनेने एसएम च्या मनात जागृत झाले.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व गांधीजींच्या हाती आले. ४ सप्टेंबर १९२० रोजी गांधीजींनी असहकार आंदोलनाची घोषणा केली. अहिंसावादी सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिश साम्राज्याचा प्रतिकार करण्याचे धोरण गांधीजींनी जनतेला दिले. जबाबदार सरकारची मागणी, शिक्षण, न्याय व्यवस्था, सैन्य आणि इतर सरकारी कार्यालयांवर बहिष्कार टाकून या कार्यालयात काम करणाऱ्यांनी राजीनामे द्यावेत तसेच स्वदेशी मालाचा अंगीकार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्याचे धोरण गांधीजींनी जाहीर केले. ‘संपूर्ण देशात एका नव्या जागृतीची लाट आली आहे व आपणही त्या लाटेत वाहून गेलो आहोत’ असे एसएम ला वाटले. अर्थात, एसएम अजून शाळेत होता आणि चळवळीत भाग घेण्याचे त्याचे वय नव्हते. परंतु असहकार चळवळीचा प्रभाव म्हणून एसएम खादी वापरू लागला. जाडीभरडी खादी वापरण्यात त्याला आनंद वाटू लागला. पुढे जाऊन देशकार्याला वाहून घेण्याचा मनोमन निर्णय एसएम ने केला.
१९२१ मध्ये टाटा कंपनीने आणि ब्रिटिश सरकारने ‘मुळशी धरण’ प्रकल्पाची सुरुवात केली. त्याला लागणारी जमीन तेथील शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. परंतु त्यांना पुरेसा मोबदला मिळाला नाही. त्यासाठी सेनापती बापटांनी आंदोलन उभारले. बापटांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संघटित केले आणि लढा उभा केला. याच प्रकरणात शेतकऱ्यांनी बापटांना ‘सेनापती’ हा किताब दिला. मुळशी सत्याग्रह झाला त्या वेळी एसएम न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी होता. मुळशी सत्याग्रहाच्या बातम्यांनी पुणे शहर दुमदुमले. वर्ग संघर्षाची ओळख एमएम ला यातून झाली. समाजातील दुर्बल घटकांना एकत्रित करून त्यांना न्याय मिळवून देण्याची आवश्यकता एसएम ला जाणवली.
याच काळात एसएम ला समाजातील वर्णभेदाची देखील जाणीव झाली. केशवराव जेधे पुणे नगरपालिकेत निवडून आले. १९२३ मध्ये पुण्यातील ‘सार्वजनिक हौदा’संबंधी एक ठराव पुणे नगरपालिकेत केशवरावांनी मांडला. पुण्यातील हौद सर्व जाती जमातीच्या लोकांसाठी मोकळे केले पाहिजेत हा त्या ठरावाचा आशय होता. तसेच महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा असा ठराव देखील केशवरावांनी मांडला. परंतु पुणे महापालिकेतील ब्राह्मण धार्जिण्या सभासदांनी हे दोन्ही ठराव नापास केले. यामागे समाजातील वर्णभेद हेच कारण होते यात कोणतीही शंका नव्हती. समाजातील वर्णभेदाची जाणीव एसएम ला या घटनांतून होत होती.
युथ लीग
१९२५ मधे एसएम ने शालेय शिक्षण पूर्ण करून बी. ए. साठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एसएम च्या देशभक्तीपर कामांना वेग आला. १९२७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे ‘युथ लीग’ची स्थापना झाली. वीर नरिमन, युसूफ मेहेर अली, भट यांनी यात पुढाकार घेतला. आपणही यूथ लीगमध्ये सामील व्हावे, असे एसएम आणि त्यांचे सहकारी ना ग गोरे आणि र के खाडिलकर यांना वाटू लागले. युथ लीगचे नेते पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांची या तिघांशी सविस्तर चर्चा झाली. ब्रिटिशांनी 'फोडा आणि झोडा' ही दुष्ट राजनीती कशी अवलंबिली आहे, हे मेहेरअली यांनी विस्ताराने सांगितले. तिघांनाही त्यांची भूमिका पटली. एसएम, गोरे, खाडिलकर इत्यादी यूथ लीगचे सभासद झाले. यूथ लीगची पुढील तीन उद्दिष्टे होती :
१) भारताला संपूर्ण स्वातंत्र्य.
२) जातीयवादाशी लढा.
३) स्वदेशीचा स्वीकार.
८ नोव्हेंबर १९२७ ला भारताला राजकीय हक्क कोणते द्यावे, हे ठरविण्यासाठी ‘सायमन कमिशन’ची नेमणूक झाली. कमिशनवर एकही भारतीय नसल्यामुळे काँग्रेसने ठराव करून कमिशनवर बहिष्कार घालण्याचे ठरविले. सायमन कमिशनच्या निषेधार्थ देशभर निदर्शने झाली. एसएम आणि युथ लीग मधील इतर सहकाऱ्यांनी पुण्यामध्ये सायमन कमिशनच्या निषेधार्थ निदर्शने केली. या वेळी एसएम ने सार्वजनिक सभेतील आपले पहिले भाषण केले. एसएम चे दुसरे जाहीर भाषण लगेच पुण्याच्या युथ कॉन्फरन्स मध्ये झाले. पुण्याच्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात ही परिषद झाली. एसएम ने आपले भाषण इंग्रजी मध्ये केले आणि त्याला श्रोत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
मेहर अलींनी पंडित नेहरूंना एका युवक परिषदेचे अध्यक्ष म्हणून बोलाविले. नेहरूंच्या भाषणांनी एसएम भारावून गेला. याचवेळी एसएम ची नेहरूंशी प्रथम औपचारिक ओळख झाली. १९२९ च्या लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. नेहरूंनी अध्यक्षीय भाषणात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर कार्यकर्त्यांनी साजरा केला. पुण्यामध्ये एसएम, गोरे आणि खाडिलकर या तरुणांच्या पुढाकाराने २६ जानेवारीस झेंडावंदन, मिरवणूक, सभा आदी कार्यक्रम करण्यात आले.
पर्वती सत्याग्रह
२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे ‘चवदार तळ्या’चा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह देशभर गाजला. एसएम आणि त्याचे युथ लीग चे सहकारी या सत्याग्रहाने प्रेरित झाले. त्यांनी अस्पृश्यताविरोधी काम हाती घेण्याचा संकल्प केला. अनेक देवळातून अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. त्यापैकी पर्वतीवरील देऊळ हे एक होते. युथ लीगच्या कार्यकर्त्यांनी पर्वती वरील देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह करण्याची योजना आखली.
१३ ऑक्टोबर १९२९ रोजी पंचवीस तीस मंडळी सत्याग्रहास निघाली. सत्याग्रहाची बातमी अर्थात पुण्यातील सनातन्यांना मिळाली होती. पायऱ्यांवरच त्यांनी सत्याग्रहींना अडवले. काहींनी धक्काबुक्की आणि मारामारी करावयास सुरुवात केली. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना निवडुंग माजला होता. सत्याग्रहींपैकी काहींना त्यांनी त्या निवडुंगात ढकलून दिले. सनातन्यांची संख्या सत्याग्रहींपेक्षा पाचपट होती. सत्याग्रही मंदिरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. जागेवर पोलीस आले होते. पण त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
सत्याग्रहानंतरही एसएम आणि त्याच्या सहकाऱ्यांना सनातन्यांच्या तिरस्काराला सामोरे जावे लागले. ते रोज संध्याकाळी खानावळीत जात असत. खानावळीत अनेक ब्राह्मण तरुण देखील जेवावयास येत असत. त्यावेळी हे सनातनी ब्राह्मण एसएम आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे बोटे दाखवून अर्वाच्य भाष्य करत.
पर्वती सत्याग्रहानंतर थोड्याच दिवसात सनातन्यांनी तुळशीबागेत मंदिर प्रवेशाच्या विरोधात एक सभा भरविली. एसएम आणि त्याचे सहकारी या सभेत पोहोचले. या सभेत सनातन्यांनी पराकोटीची भाषा वापरली. ‘जर अस्पृश्यांना मुसलमान व्हावयाचे असेल तर त्यांनी जरूर व्हावे’ असे देखील तेथील एका वक्त्याने भाष्य केले. ‘अस्पृश्यतेचा एवढा बाऊ कशाला करता? आम्ही घरात देखील अस्पृश्यता पाळतो. बाई जेव्हा मासिक पाळीत असते तेव्हा तिला देखील अस्पृश्य समजून आम्ही तीन दिवस बाहेर बसवीत असतो’ असेही या वक्त्याने उद्गार काढले. यावर एसएम संतापून म्हणाला, ‘तीन दिवस तिला दूर ठेवतो म्हणालात, पण चौथ्या दिवशी तिला किती जवळ घेता ते सांगितलं नाहीत?’ यावर उपस्थित सनातनी एसएम वर खवळले आणि त्याच्या अंगावर धावून गेले. सुदैवाने एसएम च्या मित्रांनी त्याला जागेवरून खेचून बाहेर नेले आणि जीवावर बेतलेल्या परिस्थितीतून बाहेर काढले.
संकल्प
१९२८ च्या मार्च महिन्यात एसएम ने बीए ची परीक्षा दिली. सर्वसामान्यांप्रमाणे एखादी चांगली नोकरी घेऊन संसारात स्थिरस्थावर होण्याच्या मनस्थितीत एसएम नव्हता. एसएम लोकमान्य टिळक आणि गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झाला होता. समाजातील वर्गभेद आणि वर्णभेद याचा त्याला मनस्वी तिटकारा होता आणि त्याच्या निर्मूलनासाठी अखंड प्रयत्न करण्याची त्याची तयारी होती. एसएम ने स्वतःला पूर्ण वेळ देश सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.