भाग १ : १९०४ - १९४७

१. जडण घडण (१९०४-१९२८)

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळात एक अग्रगण्य समाजवादी नेते म्हणून श्रीधर महादेव जोशी यांचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. श्रीधरचा जन्म १२ नोव्हेंबर १९०४ रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. महादेव जोशी यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप या लहानश्या गावचे. उदरनिर्वाहासाठी महादेव जोशी जुन्नरच्या कोर्टात नाझर म्हणून काम करत होते. महादेव जोशी यांचे त्यांच्या पत्नी, पाच मुले आणि तीन मुली असे दहा जणांचे कुटुंब. शिवाय श्रीधरचा चुलत भाऊ देखील त्यांच्याबरोबर सहकुटुंब राहत असे. संसाराचा सर्व भार महादेव जोशी यांच्यावरच होता. महादेव जोशी एकटेच नोकरीनिमित्त जुन्नरला राहत असत आणि बाकी सारे कुटुंब गोळप मध्ये असे.

भावंडात सर्वात मोठा शंकर. त्याला सारे दादा म्हणत. त्यानंतरचे दोन भाऊ म्हणजे बापू आणि बाळू. मग श्रीधर आणि धाकटा नाना. बहिणी तीन, ताई, अक्का आणि माई. श्रीधरचा जन्म जुन्नरला झाला तरी तिसरीपर्यंतचे शिक्षण गोळपमध्येच झाले. गोळपमध्ये तिसरीपुढच्या शिक्षणाची सोय नव्हती. महादेव जोशांनी श्रीधरला पुढील शिक्षणासाठी जुन्नरला नेले. जुन्नरमध्ये श्रीधरला चौथ्या इयत्तेत घातले. श्रीधर हुशार होता. त्याला शिक्षणात गती होती. वर्गात तो कायम दुसरा असे. श्रीधरच्या वर्गात एक ढोराचा मुलगा होता. त्याचा पहिला नंबर असे. सारी मुले बाकावर बसायची मात्र हा मुलगा खाली गोणपाटावर बसायचा. श्रीधरला मात्र ते फारसे आवडत नसे.

प्राथमिक शिक्षण 

श्रीधरच्या वडिलांना २५ रुपये महिना मिळत असत. याशिवाय जुन्नरच्या एका ट्रस्टचे कारभारी म्हणून ते काम करीत असत आणि त्याचे दरमहा २५ रुपये त्यांना मिळत असत. श्रीधरचा मोठा भाऊ पुण्यात शिकायला होता. त्याच्या आणि श्रीधरच्या शिक्षणाचा खर्च आणि गोळप मधला कुटुंबाचा खर्च या पन्नास रुपयांतून चालायचा. परंतु १५ डिसेंबर रोजी श्रीधरच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि श्रीधरच्या शिक्षणात खंड पडला. श्रीधर जेमतेम सव्वा ते दीड वर्ष जुन्नर मध्ये राहिला. वडिलांच्या मृत्यूनंतर श्रीधर गोळपला परत आला. 

गोळप मधील वातावरण सनातनी होते. धर्म, जाती आणि रीतिरिवाज यांनी समाज जखडला गेला होता. गावात जी महार मंडळी होती ती रस्त्याच्या एका बाजूने जायची आणि बाकीची माणसे दुसऱ्या बाजूने. महारांची सावली इतरांवर पडू नये हा त्यांचा हेतू. समाजात स्त्रियांना दुय्यम दर्जाने वागवले जाई. श्रीधरला लहानपणी काही विचित्र अनुभव आले आणि त्यातून श्रीधरच्या मनात सनातनी रितिरिवाजांबाबत तेढ उत्पन्न झाली. 

श्रीधरच्या शेजारी उमाकाकू लेले म्हणून एक विधवा बाई राहात असे. लहानग्या श्रीधरला उमा काकूंचा खूप लळा होता. पुढे विधवा उमा काकूंचा कुणा पुरुषाशी संबंध आला आणि तिला दिवस गेले. तो गर्भ पुढे पाडला. परंतु गावात तिची खूप निर्भत्सना केली गेली. उमाकाकूला धरणी पोटात घेईल तर बरे, असे वाटले. ती घरदार सोडून जी गेली ती गेलीच. पुन्हा तिने गाव बघितले नाही. नरसोबाच्या वाडीस भीक मागून तिने आयुष्य संपविले, असे ऐकिवात होते. या घटनेचा श्रीधरच्या मनावर परिणाम झाला. ती विधवा असली तरी तिलाही जगण्याचा अधिकार का असू नये? सर्व दोष स्त्रीचा आणि पुरुषाला सर्व गुन्हे माफ. हा कोणता न्याय?

त्या वेळी श्रीधरने आईला विचारले, 'बायको मेली तर पुरुष लग्न करतो. त्याप्रमाणे नवरा मेला तर बाईला लग्न का करता येऊ नये?' आई म्हणाली, 'तुला त्यातलं कळायचं नाही, बाईमाणूस मातीच्या भांड्याप्रमाणं असतं. मातीच्या भांड्यात आपण जर काही खाल्लं तर ते फेकून द्यायचं. ते धुवून पुन्हा त्यात खात नाहीत. पुरुष हा धातूच्या भांड्यासारखा आहे. धातूचं भांडं आपण पुनः पुन्हा घासून पुसून वापरतो. तसं आहे हे.' आईच्या उत्तराचे श्रीधरला फार आश्चर्य वाटले. बाईच्या बाबतीत एक न्याय आणि पुरुषाच्या बाबतीत वेगळा न्याय. श्रीधरला हे अनाकलनीय होते. 

गोळप मध्ये श्रीधरचा मामा राहत असे. पुरुषामामा त्याचे नाव. गोळप गावच्या खोतांचा भाऊ अर्धवट होता. पण घरच्या श्रीमंतीमुळे त्याचे एका सुंदर मुलीशी लग्न झाले. पुरुषामामाचे   त्या घरी येणेजाणे असे. खोतांच्या वेडसर भावाच्या बायकोशी त्याची मैत्री जमली. त्यातून दोघांचे संबंध आले. बातमी गावभर झाली. लोक म्हणू लागले, ‘पुरुषाला जर शेण खायचे होते तर ते खोताच्या घरी कशाला? कुळवाड्यांच्या बायका काय कमी होत्या?' याचा श्रीधरला धक्काच बसला. ब्राह्मणांच्या बायका शुचिर्भूत राहिल्या पाहिजेत. कुळवाड्यांच्या न राहिल्या तरी  चालतील. हा कोणता न्याय? हा श्रीधरच्या मनावर झालेला दुसरा आघात. 

श्रीधरच्या शिक्षणात खंड पडला होता. शिक्षण पुढे सुरू होणे आवश्यक होते. श्रीधरचा चुलत भाऊ; तात्या नागपूरला राहत असे.  त्याने श्रीधरला नागपूरला शिकण्यासाठी घेऊन जाण्याचे मान्य केले. श्रीधर त्याच्याबरोबर नागपूरला गेला. नागपूरच्या ‘सुळे  स्कूल’मध्ये श्रीधरने पाचवीमध्ये प्रवेश घेतला. परंतु दुर्दैवाने त्याच सुमारास तात्यांची नोकरी सुटली.  श्रीधरच्या शाळेची फी देणे तात्यांना शक्य होईना. जेव्हा तीन महिन्याची फी बाकी राहिली म्हणून मुख्याध्यापकांनी श्रीधरचे नाव शाळेतून काढून टाकले. नाइलाजाने श्रीधर परत गोळपला आला. 

पुण्यास प्रयाण 

श्रीधरचे एक नातेवाईक; आत्माराम लेले यांचे सासरे पुण्यामध्ये राहत असत. त्यांनी श्रीधरला पुण्यामध्ये शिक्षणाची सोय करून देण्याची तयारी दाखविली. श्रीधरचा मोठा भाऊ पुण्यातच शिकत होता. श्रीधरच्या आईने श्रीधरला त्यांच्याबरोबर पुण्याला पाठविले. जोश्यांच्या घराण्यातील एक गोविंदराव जोशी यांच्याकडे श्रीधर आश्रित विद्यार्थी म्हणून राहू लागला.  कंदिलाच्या काचा पुसणे, जेवणाची तयारी करणे, गाईंची धार काढणे, गाईंना चारा घालणे, विहिरीचे पाणी काढणे, भांडी विसळणे ही सारी कामे श्रीधर करीत असे. 

जुन्नरच्या शाळेच्या दाखल्यावर १९१८ च्या जून महिन्यामध्ये श्रीधरला रमणबागेच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ मध्ये इंग्रजी पहिली मध्ये प्रवेश मिळाला. शाळेची फी कशी भरावी हा मोठा प्रश्न होता. शाळेचे सुपरिटेन्डेन्ट एस आर कानिटकर यांना श्रीधर भेटला. त्यांना आपली सारी कथा सांगितली. फ्री स्टुडंटशिप शिवाय शिक्षण पुढे जाणार नाही हे कळकळीने सांगितले. कानिटकरांनी श्रीधरमधली शिक्षणाची आवड हेरली. त्यांनी श्रीधरला मदत करायची तयारी दर्शवली. ते गंभीरपणे म्हणाले, 'उत्तम अभ्यास कर, तुला फ्री स्टुडंटशिप दिलीय. जा आता वर्गात.' श्रीधरच्या मनावरचे ओझे उतरले. 

श्रीधरला शाळेत जिवलग मित्र मिळाले. श्रीधर आणि गोपीनाथ तळवलकर, शिखरे, ना.. गोरे, र. के. खाडिलकर, शिरुभाऊ लिमये, गं. भा. निरंतर असे अनेक मित्र श्रीधरने केले. शाळेतील शिक्षक देशप्रेमी होते. ते मुलांना अतिशय आवडीने शिकवत असत आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करत. श्रीधरने एकदा फळ्यावर देशभक्तीपर वाक्य लिहिले. आपटे सरांनी ते वाक्य वाचले आणि म्हणाले, 'बोर्डावर लिहिताय ठीक आहे. पण देशभक्ती सोपी नाही, हे लक्षात ठेवा. त्यासाठी मोठा त्याग करावा लागतो.' ते वाक्य श्रीधरच्या कायम लक्षात राहिले. 

विद्यार्थी शिक्षकांशी वाद देखील घालत. त्यावर शिक्षक मुलांना प्रेमाने उत्तरे देत. श्रीधर अभ्यासात तर हुशार होताच परंतु इतर आवडीही जोपासत होता. श्रीधरने ‘वसंत’ नावाचे एक हस्तलिखित मासिक काढले. मासिकात तो नेमाने लेख लिहीत असे. शिक्षकांनी श्रीधरची हुशारी बघून त्याला शाबासकी दिली.  श्रीधरचा उत्साह द्विगुणित झाला. श्रीधर खेळातही चांगला होता.  क्रिकेट आणि विटी दांडू हे त्याचे आवडते खेळ होते. सर्व विद्यार्थी मिळून गणपती उत्सव साजरा करत.  शाळेतील शिक्षक मुलांना किल्ले पहायला घेऊन जात.  पुरंदर,  रायगड, सिंहगड, शिवनेरी  अशा अनेक गडांवर शिक्षकांनी मुलांच्या सहली नेल्या. श्रीधर देखील सर्व उपक्रमात आवडीने भाग घेत असे. अभ्यासातही तो कायम पुढे असे. 

शाळेत असताना घडलेल्या एका प्रसंगाचा श्रीधरवर फार मोठा परिणाम झाला.  शाळेच्या समोरच लोकमान्य टिळक राहत होते.  एकदा मधल्या सुट्टीत श्रीधर आणि त्याचे मित्र लोकमान्य टिळकांना पहायला गेले. मुले आलेली पाहून टिळकांनी मुलांची सामान्य चौकशी केली. परंतु टिळकांच्या दर्शनाने श्रीधर पूर्णतः भारावून गेला. टिळकांप्रमाणेच आपणही देशासाठी काहीतरी करावे असे श्रीधरने मनोमन ठरवले. लोकमान्य टिळकांचा १९२० साली देहांत झाला. श्रीधरने टिळकांच्या अस्थी मिरवणुकीत  भाग घेतला. 

मोठ्या भावाचा पगार वाढल्यावर श्रीधरची आई आणि सारे कुटुंबच पुण्याला राहायला आले. थोरल्या भावाने पुण्यात लहानशी जागा भाड्याने घेऊन बिऱ्हाड थाटले. श्रीधर आपल्या कुटुंबाबरोबर पुण्यात राहू लागला आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपले शिक्षण घेऊ लागला. १९२५ साली श्रीधर मॅट्रिक झाला. 

मॅट्रिकनंतर श्रीधरने १९२५ च्या जून महिन्यात ‘फर्ग्युसन कॉलेज’मध्ये आर्ट्स विभागात प्रवेश घेतला. फर्ग्युसन कॉलेजमधील श्रीधरचा काळ हा त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ होता. फर्ग्युसन कॉलेजात ‘कॉन्स्टिट्यूशन’ या विषयावर प्रबंध लिहून श्रीधरने  ‘विनय’ पारितोषिक मिळवले. प्राध्यापक व्ही जी काळे यांची विद्यार्थ्यांसाठी असणारी ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ वरची व्याख्याने श्रीधर आवर्जून ऐकत असे. अर्थशास्त्र शिकवणारे प्राध्यापक व्ही जी काळे, राज्यशास्त्र शिकवणारे प्राध्यापक डी जी कर्वे,  इतिहासाचे प्राध्यापक कुंभारे आणि तर्कशास्त्र व तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक जोग ही सर्व प्राध्यापक मंडळी आस्थेने मुलांना विषय शिकवत असत.  प्राध्यापक काळे मुलांना नेहमी घरी बोलावून जर्मन मासिके वगैरे आणून देत असत.  मुंबईचे उद्योगधंदे कसे चालतात हे प्रत्यक्ष दाखविण्याकरता म्हणून एकदा शिक्षकांनी मुलांची मुंबईला सहल नेली.  मुंबईच्या गोद्या, टाइम्स ऑफ इंडियाचे कार्यालय आणि कापड गिरण्या यांचे दर्शन घडवले. 

फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना श्रीधरला पुस्तकातील ज्ञान तर मिळालेच परंतु देशातील सद्य परिस्थितीचे आकलनही झाले. १९२८ च्या मार्च महिन्यामध्ये श्रीधरने परीक्षा देऊन ‘बीए’ ची पदवी मिळविली. श्रीधरला त्याचे मित्र ‘एसएम’  म्हणून हाक मारत आणि हळूहळू श्रीधर सर्व जगात एसएम म्हणूनच ओळखला जाऊ लागला.