‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या निर्मितीत काही महत्वाच्या नेत्यांचा सहभाग होता, त्यात एसएम जोशी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी घोषित करण्यात आली. परंतु यासाठी मराठी जनतेने उभारलेला लढा मराठी माणूस विसरू शकणार नाही. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’चे सरचिटणीस या नात्याने एसएम जोशी यांनी लढ्याचे प्रभावी नेतृत्व केले आणि केंद्रीय नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. १९७५ ते १९७७ या काळात देशाला आणीबाणीच्या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागले. आणीबाणी उठल्यानंतर विरोधी पक्षांनी ‘जनता पक्षा’ची स्थापना करून देशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचा कौतुकास्पद प्रयोग केला. जनता दलाच्या निर्मितीत जयप्रकाश नारायण यांचे निकटचे सहकारी या नात्याने एसएम जोशी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत ‘एसएम’ यांना फार मोठे स्थान आहे. विचारांनी एसएम हे कट्टर समाजवादी होते. समाजवादात त्यांना मानवी मूल्यांचा सूर गवसला. गांधीजींची नैतिक मूल्ये त्यांना तितकीच आकर्षित करीत होती. गांधीजींनी साधनांच्या शुद्धतेवर आग्रह धरल्यामुळे सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यावर त्यांनी भर दिला. राजकीय जीवनात एसएम यांना "समाजवाद्यांमधील गांधीवादी आणि गांधीवाद्यांमधील समाजवादी" म्हणून ओळखले जाऊ लागले. ते  केवळ कट्टर समाजवादीच नव्हते तर एक पारदर्शी, प्रामाणिक आणि सचोटीचे राजकीय नेते आणि राष्ट्रवादी होते. त्यांनी स्वतःला लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि मानवतावाद या उदात्त आदर्शांशी जोडले होते. लोकशाही मार्गाने राजकीय सत्ता सर्वसामान्य जनतेकडे जावी या विचारांचे ते होते.

एसएम यांचे संपूर्ण नाव ‘श्रीधर महादेव जोशी’. श्रीधरचा जन्म १२ नोव्हेंबर १९०४ रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. जोशी घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप या लहानश्या गावचे. घरची गरिबी, त्यात श्रीधरच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला. श्रीधरने पुण्यात येऊन स्वबळावर आपले शिक्षण पूर्ण केले. श्रीधरने पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून मॅट्रिक केल्यानंतर BA पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ‘फर्ग्युसन कॉलेज’मधून पूर्ण केले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच श्रीधर देशप्रेमाने प्रेरित झाला. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेण्याचा निर्णय श्रीधरने घेतला. १९२८ मध्ये पदवी परीक्षा पास झाल्यानंतर श्रीधर पूर्णवेळ स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरला.

शालेय जीवनातच एसएम यांना ना ग गोरे, र के खाडिलकर यांच्यासारखे समविचारी आणि जिवलग मित्र मिळाले. सर्वांनी मिळून ‘युथ लीग’ नावाची संघटना स्थापन करून देशकार्याला प्रारंभ केला. या काळात केलेला ‘पर्वती सत्याग्रह’ एसएम यांना खूप अनुभव देऊन गेला. त्यानंतर एसएम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गांधीजींनी पुकारलेल्या ‘असहकार चळवळी’त उडी घेतली. स्वातंत्र्यलढ्यात एसएम यांना ठाणे येथे ६ महिन्याची,  येरवडा येथे २ वर्षाची, नाशिक येथे १ वर्षांची, साबरमती येथे २ वर्षांची आणि पुन्हा नाशिक येथे १ वर्षाची अशा अनेक  तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या. या काळात एसएम आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मार्क्सवादाशी ओळख झाली. मार्क्सची ध्येयं आणि गांधीजींचे साधन शुद्धतेचे विचार यांचा एकत्रित विचार करून काँग्रेसमधील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. एसएम समाजवादी गटात सामील झाले. १९४२ च्या ‘चले जाओ’ लढ्यात ते भूमिगत झाले. ‘इमाम अली’ या मुसलमान नावाने त्यांनी देशकार्य चालू ठेवले. १३ महिन्याच्या भूमिगत कार्यानंतर त्यांना मुंबईत अटक झाली आणि २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिक, साबरमती आणि येरवडा  अशा तीन तुरुंगांत त्यांनी ही २ वर्षे काढली. 

स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी गट कांग्रेसमधून बाहेर पडला आणि स्वतंत्र ‘समाजवादी पक्षा’ची स्थापना केली. एसएम समाजवादी पक्षात सामील झाले. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एसएम यांचा पराभव झाला तरी १९५३ च्या पोटनिवडणुकीत ते मुंबई राज्याच्या विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीतही ते विधानसभेवर पुन्हा निवडून आले. १९५३ ते १९६२ या काळात एसएम यांनी एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून नाव कमावले. १९६७ मध्ये एसएम यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते लोकसभेवरही निवडून आले. १९६७ ते १९७२ या काळात त्यांनी लोकसभा सदस्य म्हणून काम केले. 

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी घोषित करण्यात आली. परंतु यासाठी महाराष्ट्राला फार मोठा संघर्ष करावा लागला. संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस या नात्याने एसएम यांनी लढ्याचे प्रभावी नेतृत्व केले. संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी झालेल्या संघर्षाचे नेतृत्व करणे हा एसएम यांच्या राजकीय कारकिर्दीचा ‘सर्वोच्च बिंदू’ असे म्हणता येईल. मुंबई सकट पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ मिळून संयुक्त महाराष्ट्राची मागणी मराठी जनतेने केली. परंतु केंद्राने प्रथम त्रिराज्य योजना समोर मांडली. यात मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात अशी तीन राज्ये करण्याची घोषणा केली. त्याला विरोध झाल्यावर महाराष्ट्र, गुजरात आणि आणि मुंबई यांचे विशाल द्विभाषिक राज्य तयार करण्यात आले. याला देखील महाराष्ट्राने जोरदार विरोध करून अखेर मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य मिळवले आणि मुंबई राज्याची राजधानी झाली. 

२६ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. अनेक विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. देशातील नागरी स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यात आले. एसएम यांना मात्र तुरुंगात टाकले नाही. आणीबाणीच्या काळात सभांना बंदी असल्याने एसएम यांनी गावोगाव फिरून वैयक्तिक भेटी आणि खाजगी बैठका घेतल्या. नागरी स्वातंत्र्य आणि आणीबाणीचे परिणाम याबाबत देशात सजगता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. या काळात जयप्रकाश नारायण यांना सक्रिय राजकारणात परत आणण्यात एसएम यांनी महत्वाची भूमिका बजावली. १९७७ मध्ये आणीबाणी उठल्यानंतर ‘जनता पक्षा’च्या निर्मितीत मोठे योगदान दिले. नवीन स्थापन झालेल्या पक्षाचे महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवडणूक झाली. राष्ट्रीय स्तरावर सरकारमध्ये सहभाग असणाऱ्या सर्वपक्षीय कृतीसमितीचे अध्यक्षपद देखील एसएम यांच्याकडे आले. जनता दलाचा प्रयोग फार काळ टिकू शकला नसला तरी सर्वांना एकत्र ठेवण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न  केले. 

स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी पक्षात अनेक स्थित्यंतरे आली. या सर्व प्रक्रियेत एसएम केंद्रस्थानी होते. १९४८ साली काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्षाची स्थापना झाली. परंतु १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. समाजवादी विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे या विचारांनी १९५२ मध्ये आचार्य कृपलानी यांच्या ‘किसान मजदूर प्रजा पार्टी’बरोबर विलीनीकरण होऊन ‘प्रजा समाजवादी पक्ष’ स्थापन करण्यात आला. परंतु लवकरच १९५५ मध्ये डॉ लोहिया यांचा गट पक्षातून बाहेर पडला. १९६४ मध्ये या गटाशी पुन्हा दिलजमाई करून ‘संयुक्त समाजवादी पक्षा’ची स्थापना झाली. एसएम नव्या पक्षाचे अध्यक्ष झाले. परंतु पूर्वीच्या प्रजा समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांनी नवीन पक्षात येण्याचे नाकारले. त्यात एसएम यांचे मित्र आणि सहकारी ना.. गोरे हे देखील होते. सर्वांना एकत्र येण्यासाठी अखेर १९७१ उजाडले. समाजवादी प्रेरणेने स्थापन झालेल्या ‘राष्ट्र सेवा दला’चे १९४१ ते १९४३ आणि १९४७ ते १९५४ या काळात एसएम यांनी दलप्रमुख म्हणून काम केले. 

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावून अनेक उच्च पदे भूषवली तरी एसएम यांची राहणी अतिशय साधी होती. त्यात कोणताही बडेजाव नव्हता. वर्णाने गोरे आणि नाकी डोळी नीटस असले तरी त्यांची शरीरयष्टी किरकोळ होती. तरुण वयात अनेक वेळा तुरुंगवास भोगल्याने त्याचा प्रकृतीवर परिणाम झाला होता. दैनंदिन व्यवहार असो अथवा सार्वजनिक कार्यक्रम असो, खादीचा धुतलेला पायजमा, नेहरू शर्ट आणि काळा कोट असा त्यांचा पोशाख असे. त्यांची वाणी परखड असली तरी कुणाला कारण नसताना दुखावणारी कधीच नव्हती. 

१९८६ मध्ये एसएम यांच्या पत्नी आणि त्यांच्या जीवनातला फार मोठा आधार; ताराबाई यांचे निधन झाले. ताराबाईंच्या निधनाने एसएम यांच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली. १९८४ मध्येच एसएम यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. डॉक्टरांनी हाडांच्या कॅन्सरचे निदान केले. १ एप्रिल १९८९ रोजी पहाटे एसएम यांची शुद्ध हरपली. संध्याकाळी साडेपाच वाजता एसएम यांची प्राणज्योत मालवली. एक स्वातंत्र्य सेनानी, एक समाजवादी नेता, एक संवेदनशील माणूस हरपला!

समाजजीवन अनुप्राणित होऊन एक नवे चैतन्य संचारेल. तसे झाले म्हणजे जातीजमातींचे अहंकार निष्प्रभ होतील, जातीय भावना झडत जाईल, जुनी समाजव्यवस्था ढासळून नवसमाजाचा पाया घातला जाईल. जातींची ही डबकी फोडूनच लोकजीवन प्रवाही करता येईल, ते शुद्ध होत जाईल. अशा प्रकारे खालपर्यंत समाज ढवळून निघेल तेव्हा नवे नेतृत्व उदयास येईल. व मग त्याच्या जोरावर सत्ता हस्तगत केली तर लोकांचे प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य जनतेच्या सहकार्याने सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणी येईल.

एस एम जोशी